नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरात दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मोदींनी केजरीवाल आणि ‘आप’च्या नेतेमंडळींवर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनी ‘आप’च्या नेतेमंडळींना शहरी नक्षलवादी म्हणून संबोधित केले.
गुजरातमधील भरूच जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची जाहीरसभा सोमवारी झाली. यावेळी ते म्हणाले, राज्यात ‘शहरी नक्षलवादी’ आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी धडपड करत आहेत. त्यानुसार, त्यांच्याकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही त्यांना आमची तरुण पिढी नासवू देणार नाही. आपण मुलांना ‘शहरी नक्षलवाद्यां’पासून सावध केले पाहिजे. या लोकांनी देश उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यादरम्यान त्यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला जात आहे. त्यातच आता पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना धारेवर धरले आहे.