नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा विजय झाला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून खर्गे यांचे पारडे जड असल्याचे दिसत होते. पक्षाशी एकनिष्ठ असलेले खर्गे हेच अध्यक्षपदी विराजमान होतील, असा अंदाज होता. त्यानुसार, ते विजयी झालेदेखील. पण मल्लिकार्जुन खर्गे हे नेमके आहेत तरी कोण? याचीच माहिती आपण घेणार आहोत…
कोण आहेत खर्गे?
मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म 21 जुलै, 1942 मध्ये कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाले. त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी वकिली व्यवसायही केला. त्याचवेळी महाविद्यालयीन जीवनात त्यांनी राजकीय प्रवास सुरु केला आणि 1969 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरु झाले राजकारण.
राजकीय प्रवास…
कर्नाटकातून राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. 16 फेब्रुवारी 2021 पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. 2014-2019 दरम्यान लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते होते. डॉ. मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात देशाचे रेल्वेमंत्री, कामगार आणि रोजगार मंत्री म्हणून पदभार सांभाळला. सलग 11 वेळा निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. शिवाय कर्नाटकच्या राजकारणात तर एक मोठा चेहरा म्हणून खर्गे यांना ओळखलं जातं.
महाराष्ट्राचे निरीक्षक…
1972 पासून काँग्रेमध्येच आहेत. राज्यसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 5 राज्यांच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा खर्गे यांनी सोनिया गांधींची बाजू मांडत पराभवासाठी प्रत्येक राज्यातील नेता आणि खासदार जबाबदार आहेत, गांधी कुटुंब नाही, असे वक्तव्य केले होते. त्यातूनच त्यांचे गांधी घराण्यासोबत असलेले नाते समोर आले होते.