सूरजकुंड | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आयोजित कार्यक्रमात एक अजब प्रकार घडला आहे. त्याचीच चर्चा आता सर्वत्र होत आहे. कारण हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज (Anil Vij) हे भाषण करत असताना त्यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भर कार्यक्रमातच रोखले आणि भाषण थांबवण्याची सूचना केली. याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
हरियाणाच्या सूरजकुंड येथे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एका वर्कशॉपचं उद्धाटन करण्यात आले. यावेळी अनिल वीज यांनी स्वागतपर भाषण केले. त्यासाठी त्यांना पाच मिनिटांची वेळ देण्यात आली होती. मात्र, वीज यांनी पाच मिनिटांपेक्षा जास्त साडे आठ मिनिटे भाषण केले. नेमकं त्याचदरम्यान अमित शहा यांनी त्यांना रोखले. अनिल वीज यांनी फक्त अमित शाह यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी अचानक हरियाणाचा इतिहास, हरित क्रांतीमधील राज्याचं योगदान, ऑलिम्पिकमधील कामगिरी, खेळासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा यांसंबंधी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा अमित शहा यांनी त्यांना रोखले आणि ‘तुम्हाला पाच मिनिटं दिली होती. तुम्ही आधीच साडे आठ मिनिटं बोलला आहात. आता तुमचं भाषण थांबवा. मोठी भाषणं देण्याची ही जागा नाही. थोडक्यात आटोपा’ असे म्हटले.
दरम्यान, वीज यांनी भाषण थांबवावे म्हणून अमित शहा यांनी चिठ्ठी पाठवली होती. मात्र, त्याचा काही परिणाम दिसला नसल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचनाही केली. तरीदेखील वीज यांनी भाषण सुरुच ठेवल्याने अखेर शहा यांनी माईकवरून सूचना केली.