मोरबी | गुजरातच्या मोरबी (Morbi) येथे रविवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये जवळपास 140 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेला हा पूल 140 वर्षांपेक्षाही जुना असल्याचे सांगितले जात आहे. पर्यटकांसाठी हा पूल गेल्या 7 महिन्यांपासून बंद होता. मात्र, पाच दिवसांपूर्वीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने हा पूल पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आणि गर्दीही होऊ लागली. पण हा पूल सेफ्टी सर्टिफिकेटशिवाय सुरु असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे हा पूल पर्यटकांसाठी खुला केलाच कसा? पूल सुरु झाल्याचे माहिती असूनही त्यावर कारवाई का झाली नाही? 100 लोकांची क्षमता असणाऱ्या पुलावर 300-400 लोक पोहोचलेच कसे? गर्दी नियंत्रणात आणण्याची त्यात कोणतीही व्यवस्था का नव्हती? अशाप्रकारचे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.