नवी दिल्ली | आर्थिक दुर्बलांना (EWS) नोकरी आणि प्रवेशांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले होते. या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ७ नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
वेगवेगळ्या याचिकांमधून आरक्षणासह घटनादुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते. मात्र याच याचिकांवर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठातर्फे हा निकाल देण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात या घटनापीठाने आर्थिक दुर्बलांना देण्यात आलेले आरक्षण आणि संविधानाचे उल्लंघन या दोन मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले होते. त्यानंतर न्यायालयाने २७ सप्टेंबर रोजी या प्रकरणासंबंधीचा निकाल राखून ठेवला होता.
२०१९ साली ‘जनहित अभियान’ने या प्रकरणात मुख्य याचिका दाखल केली होती. या याचिकेत १०३ व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते. कोर्टात या याचिकेसह अन्य ४० याचिकांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे १० टक्के आरक्षण कायम राखण्याचा निकाल दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने २०१९ साली १०३ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि प्रवेशांमध्ये आरक्षणाची तरतूद केली होती. या घटनादुरुस्तीला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर केंद्र सरकारने आपली बाजू मांडली होती. यामध्ये आर्थिक मागासलेपणामुळे कोणावरही अन्याय होऊ नये तसेच उच्च शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळावी म्हणून ही घटनादुरुस्ती करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने न्यायालयात यापूर्वी सांगितले होते.