नवी दिल्ली | आपल्याला जेव्हा एखाद्या अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आल्यास तो फोन घेण्यावरून आपण अनेकदा गोंधळून जातो. काहीवेळा तर आपण फोन न घेताच कट करतो. पण आता यापासून आपली सुटका होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) लवकरच एक महत्वाची सेवा सुरु केली जाणार आहे. त्याद्वारे तुमची अनोळखी मोबाईल नंबरपासून सुटका होणार आहे.
केंद्र सरकारकडून अशी एक सुविधा अंमलात आणली जाणार असून, ज्या माध्यमातून जो व्यक्ती तुम्हाला फोन करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव्ह नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे. या योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणाऱ्या केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागणार आहे.
याशिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या नव्या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.