नवी दिल्ली | शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. त्याचा फायदाही अनेक शेतकऱ्यांना होत आहे. त्यानंतर आता फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिना व्याज देण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारने घेतला आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना शून्य व्याजदरावर तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल. या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी फलोत्पादन शेती करू शकतील. सध्या छत्तीसगड राज्यात फलोत्पादन पिकांचे क्षेत्रफळ 834.311 हेक्टर आहे. तर त्याचे उत्पादन 11236.447 मेट्रिक टन आहे.
सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी हॉर्टिकल्चर शेती करण्यासाठी प्रेरित होऊ शकतील. यावर कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, फक्त छत्तीसगडमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात हॉर्टिकल्चर शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी अनुदान
याप्रकारे संरक्षित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेड नेट हाऊस लावण्यासाठी अनुदान देत आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना सातत्याने किसान कॉल सेंटरवरून शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. शेतकरी 18001801511 या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकतात.