नवी दिल्ली | देशात Cyber Fraud च्या घटना सातत्याने वाढत आहे. अनेक लोक याला बळी देखील पडतात. आपली एक चूक महागात पडू शकते आणि बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची आता गरज आहे.
स्कॅमर्स फ्रॉड करताना अनेक प्रकारांचा अवलंब करत आहेत. कधी वीज कपातीचा मेसेज देत तर कधी नोकरी मिळाल्याचा खोटा मेसेज देत फसवणूक करत आहेत. या मेसेजसोबत स्कॅमर्स एक लिंकही शेअर करतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची बहुतांश माहिती स्कॅमर्सला मिळू शकते.
नोकरीच्या नावाने फसवणूक
यामध्ये युजरला जॉब अॅप्लिकेशन मंजूर झाल्याचा मेसेज येतो. त्यानंतर पगाराचीही माहिती दिली जाते. शेवटी एक लिंक देऊन त्याला त्यावर क्लिक करायला सांगितले जाते. तेव्हाच डिटेल्स चोरी केली जाते.
बँक खाते ब्लॉक नावाने मेसेज
बँक खाते किंवा कार्ड ब्लॉक होईल, असे मेसेज पाठवला जातो. यामध्ये कधी SBI YONO बंद करण्याचे सांगितले जाते. तर कधी HDFC नेटबँकिंग ब्लॉक करण्याबाबत सांगितले जाते. यावर दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
वीज तोडण्याचाही मेसेज
सध्या सर्रासपणे मिळत असलेला मेसेज म्हणजे वीज तोडण्याचा इशारा. यापासून वाचण्यासाठी एक नंबर दिला जातो. त्या नंबरवर फोन करण्याचे सांगितले जाते. हा नंबर स्कॅमरचा असतो. स्कॅमर तुमची सर्व खाजगी माहिती चोरू शकतो आणि तुम्हाला फटका बसू शकतो.
कर्ज मंजूर झाल्याचे मेसेज
आपल्याला अनेकदा कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज येतो आणि त्याच माध्यमातून फसवणूक केला जातो. त्यामध्ये लोकांना प्री-अप्रूव्ड कर्जाचा मेसेज मिळतो. त्यानंतर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक होऊ शकते.
कस्टमच्या नावावरही टार्गेट
सध्या एक नवा प्रकार झपाट्याने वाढत आहे. यात तुम्हाला महागडं गिफ्ट मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, सीमा शुल्क भरल्यानंतरच हे मिळू शकते. पण जेव्हा संबंधित व्यक्ती कस्टम ड्युटी भरते आणि गिफ्ट काय मिळतं नाही, तेव्हा त्याला आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे कळते.