कोलंबिया | भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईनं चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकावर आपल नाव कोरलं आहे.
वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २०० किलो वजन उचलून मीराबाई चानूने ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवून इतिहास रचला आहे. तर हौ झिहुआने एकूण १९८ किलो वजन उचललं. तसेच चीनच्या जियांग हुआहुआने २०६ किलो वजन उचलून जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णभरारी घेतली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मिराबाईसाठी हे पदक मिळवणे सोपं नव्हतं. सुरुवातीच्या स्नॅचमध्ये ८५ किलो, दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो, यानंतरच्या प्रयत्नात मात्र मीराबाई चानूनं ११३ किलो वजन उचलून जियांग हुआहुआशी बरोबरी साधली.
सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण सत्रादरम्यान मीराबाईच्या मनगटाला दुखापत झाली होती. तिनं दुखापतीसह राष्ट्रीय खेळांमध्येही भाग घेतला होता आणि इथेही ती पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती असे तिचे प्रशिक्षक विजय शर्मा म्हटले आहे.
दरम्यान, मीराबाई चानूने हे रौप्यपदक मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील मीराबाईचे हे दुसरं पदक आहे. यापूर्वी 2017 मध्ये तिने सुवर्णपदक जिंकलं होतं.