- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डॉ. सागर डोईफोडे यांना दिल्या शुभेच्छा!
कुपवाडा | महाराष्ट्राचे सुपूत्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवेत असलेले धडाडीचे आयएएस डॉ. सागर डोईफोडे यांची कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. सागर डोईफोडे हे २०१४ च्या बॅचचे अधिकारी असून आतापर्यंत त्यांनी अनेक संवेदनशील ठिकाणी काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. सागर डोईफोडे हे जम्मू-काश्मीर सरकारच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आयोगाचे ओएसडी म्हणून काम पाहात होते. त्यापूर्वी त्यांनी दोडा, उरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जम्मू-काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील असलेल्या राज्यात महत्वाच्या स्थानावर प्रशासनामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुपूत्र कार्यरत असल्याचा मराठी माणसाला खूप अभिमान आहे. डॉ. सागर डोईफोडे हे पुण्यातील असून त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निंबोडी आहे.
कुपवाडा हा जिल्हा प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. मात्र, जिथे अडचणी व समस्या अधिक तिथेच काम करण्यासाठी संधी मोठी असते असे माननाऱ्यांमध्ये आएएस डॉ. सागर डोईफोडे यांचा समावेश होतो. प्रशासकीय सेवेत त्यांनी आतापर्यंत अनेक संवेदनशील ठिकाणी काम करून महत्वाची भूमिका बजावली असल्याने याठिकाणीही उत्तम कामगिरी करतील असा विश्वास आहे.