नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी होती. मात्र, आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चीन, जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून यावर विशेष उपाययोजना केल्या जात आहे. त्यानुसार, आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र दिले आहे.
चीनमध्ये दिसून येणारी प्रकरणं ही ओमायक्रॉनचा बीएफ 7 (BF7) या व्हेरिएंटची आहेत. ही बाब लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितले आहे.
तसेच राजेश भूषण यांनी टेस्टिंग, उपचार आणि ट्रेसिंग यांच्यावर अधिक भर देण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यातील सर्व नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगितले आहे.