कोलंबो | भारत पाकिस्तानचे सामने अतिशय चुरशीचे आणि थरारक असतात. केवळ यांच्या स्पर्धेसाठी क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी पाहायला मिळते. असाच एक सामना पुन्हा एकदा होणार आहे. इमर्जिंग एशिया कप 2023 ची फायनल या दोन्ही संघामध्ये होणार आहे. हा सामना श्रीलंका येथील कोलंबोच्या (R. Premadasa Stadium) मैदानात रविवारी दुपारी २ वाजता होणार आहे.
भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला तर पाकिस्तानने श्रीलंका संघाविरोधात विजय मिळवत फायनलचे तिकिट मिळवले. बुधवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारत आशिया चषकावर नाव कोरतय, हे पाहणं औत्सुक्याचे आहे.
इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारताने निर्वादित वर्चस्व मिळवले आहे. आतापर्यंत भारताचा एकाही सामन्यात पराभव झाला नाही. बांगलादेशचा पराभव करत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. साई सुदर्शन, यश धुल आणि अभिषेक शर्मा यांनी फलंदाजीचे मोठे योगदान दिलय. हर्षित राणा आणि राजवर्धन हंगरकेकर, निशांत सिंधू आणि मानव सुतार यांनी भेदक मारा केला. युएई आणि नेपाळ दोन्ही संघांना भारतीय गोलंदाजांनी ऑलआऊट केले होते. पाकिस्तान विरोधातही साखळी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. आता फायनलमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
मोहम्मद वासिम आणि शहनवाज धानी यांनीही मोठे योगदान दिलेय. कासिम अक्रम या 20 वर्षीय खेळाडूनेही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय. कासिम अक्रम याच्या गोलंदाजीचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान असेल. त्याशिवाय एस फरहान आणि कामरान गुलाम यांनीही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय. या स्पर्धेत पाकिस्तान संघाला फक्त भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला, हा अपवाद वगळता पाकिस्तानने प्रत्येक सामन्यात विजय मिळवलाय.
दरम्यान, हा सामना फॅनकोड अॅप आणि संकेतस्थळावर पाहता येणार आहे. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरच्या चॅनलवरही (Star Sports Network) हा सामना चाहत्यांना पाहता येईल.