नवी दिल्ली | राष्ट्रीय पक्षांना २००४-०५ ते २०२०-२१ या काळामध्ये अज्ञात स्रोतांकडून मिळालेल्या बेनामी १५ हजार ७७ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.’असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संघटनेने केलेल्या विश्लेषणामध्ये ही माहिती समोर आली आहे. या विश्लेषणामध्ये आठ राष्ट्रीय पक्ष आणि २७ प्रादेशिक पक्षांच्या निधीच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पक्षांनी भरलेला प्राप्तिकराचा परतावा आणि निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले त्यांच्या देणग्यांचे ताळेबंद यांचे विश्लेषण केले आहे.
या माहितीनुसार, २०२०-२१ या वर्षी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना अज्ञात स्रोतांकडून मिळालेला निधी ६९०.६७ कोटी रुपयांचा आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल पीपल्स पक्ष यांचा समावेश आहे. तर, प्रादेशिक पक्षांमध्ये आम आदमी पक्ष, आसाम गण परिषद, अण्णा द्रमुक, फॉरवर्ड ब्लॉक, एमआयएम, एआययूडीएफ, बिजू जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), डीएमडीके, द्रमुक, धर्मनिरपेक्ष जनता दल, संयुक्त जनता दल, जीएफपी, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, अकाली दल, शिवसेना, मनसे, केसी-एम, एनडीपीपी, एनपीएफ, पीएमके, एसडीएफ, तेलगू देसम पक्ष, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर-काँग्रेस या पक्षांचाही समावेश आहे.
अज्ञात स्रोतांकडून आलेल्या निधीच्या क्रमवारीमध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये वायएसआर-काँग्रेस ९६.२५ कोटी रुपयांसह पहिल्या, तर ८०.०२ कोटी रुपयांसह द्रमुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बिजू जनता दल (६७ कोटी), चौथ्या क्रमांकावर मनसे (५.७७ कोटी) आणि पाचव्या क्रमांकावर आम आदमी पक्ष (५.४ कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २००४-०५ ते २०२०-२१ या काळात कूपनच्या विक्रीतून चार हजार २६१.८३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.
राष्ट्रीय पक्षांना २०२०-२१ वर्षात ४२६.७४ कोटी, तर २७ प्रादेशिक पक्षांना २६३.९३ कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून मिळाले आहेत. या वर्षात काँग्रेसला १७८.७८ कोटी रुपयांचा निधी अज्ञात स्रोतांकडून आला आहे. राष्ट्रीय पक्षांकडून अज्ञात स्रोतांकडून आलेल्या निधीपैकी हे प्रमाण ४१ टक्के आहे. तर, भाजपला अशा पद्धतीने मिळालेला निधी १००.५० कोटी रुपये असून, राष्ट्रीय पक्षांच्या निधीतील हा वाटा २३.५५ टक्के आहे.