देशात सहाव्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडलं आहे. तर सातवा आणि शेवटचा टप्पा हा १ जून रोजी होणार आहे…त्या पार्श्वभूमीवर देशात तयारीही जोरदार सुरु आहे. त्यात या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपने अब की बार चारसो पारचा नारा दिला. त्यानंतर भाजपने आपल्या प्रत्येक प्रचार सभेला संबोधित करताना नागरिकांना चारसो पारची आठवणही करून दिली. भाजपच्या या नाऱ्यामुळे मात्र विरोधकांना धडकी भरली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच जनता पुन्हा आपल्याला भरभरून मतं देतील असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपला 400 जागा मिळवून संविधान बदलायचे आहे आणि आरक्षण संपवायचंय असा आरोप केला.
देशात हुकूमशाही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एनडीएने 400 जागांचा आकडा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे..त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरु असतानाच भाजपच्या बड्या नेत्याने ‘अब की बार, 400 पार’ या घोषणेमागचं गणित उघड केलं आहे. त्यांनी भाजपला 400 जागांची गरज का आहे याविषयी मोठ वक्तव्य केलं आहे. भाजपचे ते नेते कोण आहेत? आणि त्यांनी यामागचं कारण काय सांगितलं याच विषयी सदर व्हिडीओतून जाणून घ्या…
देशात निवडणुक सुरु असताना जो तो आपल्या सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात विविध मुद्द्यांवरून तू तू मैं मैं सुरु आहे. भाजपचं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागांवर निवडून यायचं असं ध्येय आहे त्यामुळेच भाजपने अब की बार चारसो पार असा नारा दिला आहे. भाजपच्या या घोषणेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीकाही केली होती. राहुल यांनी काही आठवड्यांपूर्वीच मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका रॅलीला संबोधित करताना भाजपच्या या घोषणेवर निशाणा साधला. भाजपला देशाचे संविधान बदलायचंय त्यामुळे त्यांना 400 पेक्षा जास्त जागांची गरज आहे. भाजप नेत्यांनीही स्पष्टपणे सांगितलंय की, सत्तेत आल्यास ते संविधान बाजूला ठेवणार आहेत त्यामुळे त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे. याशिवाय भाजपचे नेते आरक्षण हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहेत दुसरीकडे कॉंग्रेस आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढवणार असल्याचं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं आहे.
विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या रक्षणासाठी आपण आपल्या प्राणाचीही आहुती देऊ. काँग्रेसनेच संविधानावर हल्ला केला होता पण ती वेळ आता निघून गेली आहे म्हणूनच मी म्हणतो की, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत मी या संविधानासाठी लढत राहणार असल्याचं मोदींनी म्हटलंय तर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे नेते आणि झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निशिकांत दुबे यांनी चोख उत्तर दिलं आहे. भाजपने 400 जागांचे लक्ष्य पार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. भाजपचा संविधान बदलण्याचा कोणताही विचार नाही. पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) भारतात विलीन करता येईल या हेतूने एनडीए आणि भाजपला 400 जागांची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केलंय.
आता भाजपच्या या घोषणेवर विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे सर्वसामान्यांच्याही मनात संविधान बदलाची भीती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर जनतेच्या मनात असलेल्या या भीतीचा कसा आणि किती परिणाम होतो हे पाहण महत्वाचे असणार आहे.