भाजप सरकरने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या’ दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या महायुती सरकारनं
अध्यादेश काढत याबाबतची घोषणा केली आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया
अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू
केली होती. याच घटनेचा आधार घेत आता केंद्रातली महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचं स्वतः अमित शाह
यांनी स्पष्ट केले आहे.
“25 जून 1975 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकुमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लागू करत
देशातील लोकशाहीचा गळा घोटला होता, लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले, माध्यमांचे आवाज बंद करण्यात आले.
त्यामुळे भारत सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या’ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे यावेळी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
25 जून 1975 ला नेमकं काय घडलं होतं?
1967 ते 1971 दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकार आणि काँग्रेस पक्षावर संसदेत बहुमत मिळवले होते.
त्यानंतर डिसेंबर 1973 ते मार्च 1974 दरम्यान गुजरातमधील नवनिर्माण चळवळीतील सर्वात लक्षणीय अशी चळवळ होती. या
चळवळीने गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या असंतोषाने केंद्र सरकारला राज्य विधिमंडळात विसर्जित
करण्यास भाग पाडले होते. ज्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लावण्यात
आली. दरम्यानच्या काळात नेत्यांवर हत्येचे प्रयत्न ही करण्यात आले. यातूनच केंद्रीय रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा यांची
याकाळात बॉम्ब टाकून हत्या करण्यात आली. या सर्व घटनांमुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला
होता. यानंतर देशातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात कलम 352 अंतर्गत,
राजकीय तसेच सामाजिक अशांतता पसरल्यामुळे 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा केली.
या आणीबाणीच्या घोषणेमुळे देशात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. सरकार आणि सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या
हजारो लोकांना जेल मध्ये टाकण्यात आले, माध्यमांच्या स्वातंत्रावर बंदी घालण्यात आली, लोकांच्या भाषण स्वातंत्र्यावर बंदी
घालण्यात आली. तसेच सरकारचे राजकीय विरोधक असणारे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी पंतप्रधान अटल
बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, मुलायम सिंह यादव, मोरारजी देसाई,जॉर्ज फर्नांडीस, लालकृष्ण अडवाणी, अरुण
जेटली, यांसह पत्रकार, विद्यार्थी, समाजसेवक यांसारख्या अनेकांना ताबडतोब तुरुंगात टाकण्यात आले. वृत्तपत्रांना सरकार
विरोधात काही प्रकाशित करण्यास मज्जाव घालण्यात आला. 25 जून 1975 ते 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीमध्ये
देशात आणीबाणी लावण्यात आली होती. याच आणीबाणीवरून आजवर अनेकदा भाजप आणि एनडी आघाडीतील घटक
पक्षांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत. अनेक राजकीय विश्लेशकांच्या मते देशात आणीबाणी लावण्याचा इंदिरा गांधींनी घेतलेला
हा निर्णय तत्कालीन परिस्थितीला अनुसरून चुकीचा असल्याचंही सांगितलं जातं. आणि याच कारणांतून सध्या भाजप प्रणिती
एनडी सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे.