क्रीडाविश्वात ऑलिम्पिकला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वांत मोठी जागतिक स्पर्धा म्हणून ऑलिम्पिकची ओळख आहे. आणि या स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकणाऱ्या खेळाडूचा आणि देशाचा नावलौकिक सर्वदूर होतो… २६ जुलै पासून ३३व्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिस सज्ज झालं.. ऑलिम्पिक स्पर्धेचा उदघाटन सोहळा याआधी स्टेडियमवरचं पार पडायचा पण यावर्षी १२८ वर्षांपासूनची परंपरा मोडत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा स्टेडियमऐवजी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या बाजूने वाहणाऱ्या सीन नदीच्या पात्रात पार पडणार आहे. जगभरातील १०,५०० खेळाडूंप्रमाणेच भारतातील ११७ खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झालेत. परंतु सगळ्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताचा आजपर्यंतचा इतिहास काय आहे..? हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना १९२७ साली झाली असली तरीसुद्धा भारत देश हा १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतोय. भारताने १९०० मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला. तेव्हा भारताकडून खेळणाऱ्या ब्रिटीश इंडियन नॉर्मन प्रिचर्ड यांनी अॅथलेटिक्समध्ये भारताला दोन रौप्य पदकं जिंकून दिली त्यामुळे भारत हा ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला आशियाई देश बनला. १९०० मध्ये अॅथलेटिक्स मध्ये दोन पदकं जिंकल्यानंतर १९२० ला पहिल्यांदाच भारताने आपला स्वतंत्र संघ पाठवला आणि तेव्हापासूनच भारत ऑलिम्पिक स्पर्धेत सातत्याने भाग घेऊ लागला. १९२० ला जेव्हा भारताने पहिल्यांदाच आपला स्वतंत्र संघ पाठवला तेव्हा त्या संघामध्ये तीन खेळाडू पूर्णा बॅनर्जी, फडेप्पा चौगुले, सदाशिव दातार यांचा समावेश होता. तर दोन कुस्तीपटू कुमार नवले आणि दिनकाराव शिंदे यांच्यासोबत व्यवस्थापक सोहराब भूत आणि ए.एच.ए. फिझी यांचा समावेश होता. कुस्तीपटू दिनकाराव शिंदे यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला विजय मिळवला. पुरुषांच्या फेदरवेट ५४ किलो मध्ये ग्रेट ब्रिटनच्या हेन्री इनमनचा पराभव केला. त्यामुळे कुस्तीपटू दिनकाराव शिंदे यांनी १९२० च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत ते चौथ्या क्रमांकावर राहिले. पूर्णा बॅनर्जी, फडेप्पा चौगुले, सदाशिव दातार आणि कुस्तीपटू कुमार नवले यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर १९२० च्या दशकात भारतीय ऑलिम्पिक चळवळीची स्थापना झाली. या चळवळीच्या संस्थापकांमध्ये दोराबजी टाटा, ए.जी. नोहेरेन, एच.सी. बक, मोइनुल हक, एस. भूत, ए.एस. भागवत यांच्यासह प्रमुख संरक्षकांमध्ये महाराजा आणि राजेशाही राजपुत्र यांचा देखील समावेश होता. ज्यामध्ये पटियालाचे भूपिंदर सिंग, नवानगरचे रणजितसिंह, कपूरथलाचे महाराज आणि बर्दवानचे महाराज होते. भारताने १९२३ मध्ये अखिल भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना देखील केली.