वंदे भारत एक्सप्रेस हि भारतीय रेल्वेची एक अर्ध द्रुतगती रेल्वे आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी ‘ट्रेन १८’ चे नाव बदलून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ असे करण्यात आले. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी वंदे भारत ट्रेन सेवेत आली. वंदे भारताच्या माध्यमातून रेल्वेचा चेहरा मोहरा बदलू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला ब्रेक लागणार असल्याचं दिसत आहे. देशभरात भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारतात सध्या ४०हून अधिक मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यापैकी पाच मार्ग हे महाराष्ट्रातील आहेत. आणि वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेनच्या मार्गांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने रेल्वेने गेल्यावर्षी १०० ट्रेनसाठी टेंडर काढले होते. त्याप्रमाणे पुढीलवर्षी जुलै महिन्यात नव्या गाड्यांच्या प्रोटोटाईपची चाचणी घेण्याचे नियोजन होते.
फ्रान्सची कंपनी आस्लटम इंडियाला १०० ट्रेन बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. त्याबाबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली होती. परंतु काही आर्थिक तडजोडींवरून ही प्रक्रिया लांबत चालली होती. परंतु यावर काहीच तोडगा न निघाल्याने ही प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेला पुन्हा टेंडरप्रक्रिया राबवावी लागणार असल्याने यासाठी बराच वेळ लागू शकतो. आस्लटम इंडिया कंपनीने प्रति ट्रेन १५०.९ कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु मागणी जास्त असल्याने ही किंमत १४० कोटींपर्यंत आणण्यासाठी चर्चा सुरू होती. पण कंपनीने १४५ कोटींपर्यंत किंमत कमी केली होती. पण त्यानंतर रेल्वेकडून हे कॉन्ट्रॅक्टचं रद्द करण्यात आलं. पण आता या संबंधी नवीन टेंडर काढून त्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या सगळ्याला वेळ लागणार आहे.