महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी नवीन मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना या कारभार सांभाळणार आहेत. पण या सर्व घडामोडी घडण्यामागची नेमकी कारणं काय ? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल यांनी नेमकी कोणती खेळी केली आहे? याचे राजकीय अर्थ काय आहेत? नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा पदभार स्वीकारणाऱ्या आतिशींसमोरची आव्हानं काय? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
जवळपास पाच महिने तुरुंगातून सरकार चालवल्यानंतर 13 सप्टेंबरला सायंकाळी उशिरा केजरीवाल यांना जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आले. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आतिशी मार्लेना यांची पक्षाकडून एकमताने दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली. आतिशी या उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहास विषयात अभ्यास केलाय. चेवनिंग स्कॉलरशीपमधून त्यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलंय. अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करून केवळ विरोधकांनाच नाही तर अनेक राजकीय जाणकारणांनाही आश्चर्यचकित केलं. तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल हा गौप्यस्फोट करतील अशी अपेक्षाही कुणाला नव्हती. त्यामुळे केजरीवाल यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात खरं तर अनेक कारणं दडली आहेत. केजरीवाल हे दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दुसऱ्यांदा जामीन दिला. त्यांच्यावर आरोप झाल्याच्या अगदी सुरुवातीपासूनच भाजपसह दिल्ली काँग्रेसने राजीनाम्याची मागणी केली होती..केजरीवाल मात्र राजीनामा न देण्यावर ठाम होते. तुरुंगातून सरकार चालवून दाखवू असंही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं होतं. दरम्यान 13 सप्टेंबरला त्यांना जामीन मिळाला आणि तुरुंगातून बाहेर येताच दोन दिवसांत राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. पण राजीनामा देऊन CM पदापासून मुक्त होणे याचा राजकीय अर्थ अनेक अर्थांनी आपण पाहिला तर केजरीवालांना पहिल्या निवडणुकीप्रमाणे सहानुभूती मिळवून निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मला सत्ता महत्वाची नसून लोकांचा विश्वास महत्वाचा आहे. लोकांची मतं हेच विश्वासाचं प्रमाणपत्र असा संदेश देण्याची त्यांची खेळी असू शकेल.