दुबई | पाकिस्तान क्रिकेट टीमने हाँगकाँगवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. येत्या रविवारी (ता.४)
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढतीचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाने आशिया कपमध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर २८ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट राखून पराभव केला. आशिया चषक स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांबरोबर खेळण्याची संधी दिली जाणार आहे.
या साखळी फेरीनंतर सुपर-४ ही फेरी खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत जे दोन संघ जास्त विजय मिळवतील किंवा तिन्ही संघांनी जर प्रत्येकी एक विजय मिळवला तर रनरेटनुसार हा निर्णय घेण्यात येईल.त्यानुसार पाकिस्तानने हाँगकाँगवर काल दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे.दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना सुपर ४ मध्ये भारत पाकिस्तानच्या लढतीची उत्सुक्ता आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खूप कमी वेळा होते. त्यामुळे क्वचितच दोन्ही संघ आमने-सामने येतात. आशिया कपच्या निमित्ताने आठवड्याभरात दुसऱ्यांदा हे घडणार आहे.