ब्रिटन | भारतात गेल्या अनेक महिन्यांपासून ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीची चर्चा होती आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय वंशाचे अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांना मिळालेली उमेदवारी.अखेर ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची बहुप्रतिक्षित निवडणूक आज संपली आहे.भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.मात्र अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला होता. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला. यामुळे सुनक यांच्यासह जवळपास ५० जणांनी राजीनामा देत बंड पुकारले होते. यात सरकारचे मंत्रीदेखील असल्याने जॉन्सन यांनी अखेर राजीनामा दिला होता. यानंतर नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती…कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा नवीन नेता निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुनक आणि ट्रस यांच्यात चुरस निर्माण झाली.टीव्ही डिबेटमध्ये सुनक त्यांच्या खूप मागे पडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान, ऋषी सुनक हे देशातील समस्यांबाबत जनतेवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत तर कंझर्व्हेटिव्ह पक्षातील त्यांच्या प्रतिस्पर्धी लिझ ट्रस या ते करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
मतदानाची टक्केवारी 82.6 टक्के असून लिझ ट्रस यांना एकूण 81,326 मते, तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. लिझ ट्रस यांनी कर कमी करण्याच्या आश्वासनावर निवडणूक लढवली आहे. पंतप्रधान झाल्यास १.२५ टक्क्यांपर्यंत कर कपात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, तर ऋषी सुनक याउलट कर वाढवण्याचा आग्रह धरत राहिले. कर कपातीचा फायदा फक्त श्रीमंतांनाच होईल, त्यामुळे त्याची गरज नाही असे ऋषी सुनक यांचे म्हणणे होते.