पुणे | स्वच्छता व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यासंबंधीत संस्कार व्हावेत या उद्देशाने लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी पुरंदर व जेजुरी गडावर स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविले.
महाराष्ट्राला संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेच्या बाबतीत दिलेला मोठा वारसा आहे. या परंपरेचं जतन व्हावे आणि नवीन पिढींवर सामाजिक संस्कार व्हावेत यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित सर्वच शाळांमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जातात. हा वारसा जतन करण्यासाठी आणि स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी पुरंदर गड व जेजुरी गडावर स्वच्छता अभियान राबविले. याचबरोबर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देताना पर्यावरणाचे महत्वही पटवून दिले.
त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भक्तांनी आणि पर्यटकांनी विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे कौतुक करताना त्यांच्यासोबत या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे संयोजन लोकसेवा शैक्षणिक संकुलातील क्रीडा विभागातील शिक्षक गणेश कणसे, विशाल, रुपेश त्रिंबके, योगेश कानडे यांनी केले. तर पांडुरंग जगताप आणि शंकर साळुंखे यांनी या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले.