पुणे | ‘सीओईपी’सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देणाऱ्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्याचे भाग्य मला लाभले. उत्तराखंडसारख्या दुर्गम भागातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही अभिमानाची बाब आहे. अशी भावना सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर याचे आयोजन केले होते. या वेळी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, प्रमुख वक्ता आणि पुरस्कार विजेते गौर गोपाल दास, नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक प्रा. एम. सुतावणे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते आदी उपस्थित होते. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष जगदीश कदम, लडाखचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सतीश खंदारे, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै, एस्सार ऑइल अँड गॅसचे माजी व्यवस्थापकीय संचालक विलास तावडे या माजी विद्यार्थ्यांना सीओईपी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कोश्यारी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय सहकार्याचे हे युग असून, ‘सीओईपी’नेही मानवतेच्या कल्याणासाठी काम करावे, या नव्या जगामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, स्वामित्व हक्क आणि सायबर सुरक्षा ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कोणत्याही विद्याशाखेतील अभियंत्याला यांचे ज्ञान घेता येईल.”
महाविद्यालय ते तंत्रज्ञान विद्यापीठापर्यंतचा प्रवास उलगडताना प्रतापराव पवार म्हणाले, “मागील २० वर्षांच्या सांधिक प्रयत्नांचे हे यश असून, यामध्ये सर्वच सरकारांचे सहकार्य लाभले आहे. ‘सीओईपी’ला ज्ञाननिर्माता विद्यापीठ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून त्याची दिशा आणि कार्यपद्धती स्पष्ट झाली आहे.” आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळाले. पण माझ्या महाविद्यालयाकडून मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अनमोल आहे, अशी भावना गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले. गिते यांनी पुरस्कारांची पार्श्वभूमी मांडली, तर डॉ. सुजित परदेशी यांनी आभार मानले.