‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तर्फे (एमपीएससी) पुढील वर्षातील पदभरती परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. ‘एमपीएससी’ने भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार, उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळावा, यासाठी दरवर्षी तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा चार जूनला होणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबरला आणि वनसेवा मुख्य परीक्षा चार नोव्हेंबरला होणार आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबरला होणार आहे.
‘एमपीएससी’ने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपाची परीक्षा पद्धत बंद करून वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. ही पद्धत पुढील वर्षीपासून लागू करण्यात येणार असल्याचेही ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे. मात्र, नवी पद्धत २०२५ पासून लागू करण्याची विनंती उमेदवारांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर २०२३च्या परीक्षांचे वेळापत्रक ‘एमपीएससी’ने वेबसाइटवर जाहीर केले.
वेळापत्रकात दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२३, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आदी पदांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा २०२३’अंतर्गत ३३ संवर्गातील पदे, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक आदी पदांचा समावेश आहे. या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्याचा संभाव्य महिना, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या संभाव्य तारखा, संबंधित परीक्षांचे स्वरूप आदी तपशील नमूद करण्यात आला आहे.
परीक्षा आणि तारखा
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा – 19 मार्च
- अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 30 एप्रिल
- अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा – 02 सप्टेंबर
- अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा – 09 सप्टेंबर
- सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा – 10 सप्टेंबर
- नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा – 04 जून