एमआयटी संस्थेचे संस्थापक प्रा.प्रकाश जोशी यांच्या मार्गदर्शनात टीबीआयची गरूड झेप पुणे | माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत सुरू असलेल्या एमआयटी टेक्नॉलॉजी बिजनेस इनक्युबेशन सेंटरतर्फे नवउद्योजकांना स्टार्टअप प्रशिक्षण, मार्गदर्शन व अर्थसहाय्य अनुदान मिळवून देण्यासाठी एमआयटी टीबीआय प्रयत्न करीत आहे. तसेच आपल्या नवकल्पना उद्योगांमध्ये रुपांतरित करा असे आवाहन देखील एमआयटी संस्थेचे संस्थापक व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.त्याचबरोबर तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, कृषी तंत्रज्ञान, जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, वैद्यकीय तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी इत्यादी क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य व मार्गदर्शन केले जाते. जवळपास ३७ स्टार्टअप कंपन्या एमआयटी टीबीआयमध्ये उत्पादने व सेवा विकसित करत आहे.देशात प्रथमच एका खाजगी विद्यापीठाच्या सेंटरला केंद्र सरकारकडून सहाय्य मिळाले आहे. कोणत्याही स्टार्टअपला आपली कल्पना विकसित करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासते. यासाठी विविध सरकारी व खाजगी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम उपक्रमाअंतर्गत एमआयटी टीबीआय एकूण तीन कोटी रूपयांचे सहाय्य देणार आहे.यामध्ये १० लाख रूपयांपर्यंत अनुदान तसेच ३० लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद असेल. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजनेअंतर्गत विविध कंपन्यांकडून स्टार्टअपस्ना आर्थिक सहाय्य व अनुदान मिळवून देण्यासाठी एमआयटी टीबीआय प्रयत्न करीत आहे.एमआयटी टीबीआयतर्फे आजपर्यंत ५० पेक्षा अधिक विद्यार्थी व नवउद्योजकांना त्यांच्या स्टार्टअपसाठी विविध प्रकारचे सहाय्य देण्यात आले आहे. यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत स्टार्टअपचा समावेश आहे.पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी व इतर तरूणांनी नोकरी शोधण्याच्या मागे न लागता आपल्या कल्पनांना विकसित करून त्याचे रुपांतर यशस्वी कंपनीत करावे. स्वतः उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. या उद्देशाने एमआयटी टीबीआयची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील ६ महिन्यांमध्ये जवळपास ५० स्टार्टअप कंपन्यांना सहाय्य देण्याचा एमआयटी टीबीआयचा संकल्प आहे असे प्रा. प्रकाश जोशी यांनी यावेळी सांगितले.