अनोख्या अभियानाबद्दल होतेय सर्व स्तरातून कौतुक
पुणे | लोकसेवा संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल, टेन टी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाच्या दरम्यान स्वच्छता अभियानाचा अनोखा उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुलातील या विद्यार्थीनी पुणे दर्शनासाठी शहरात आल्या होत्या. लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून त्यांनी कोंढवा येथील पुण्यधाम आश्रम येथे भेट देऊन स्वच्छता अभियान राबविले.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी, या म्हणीचे रूपांतर ‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी, ती जगाला उद्धारी, असे करून या रणरागिणी पुढे सरसावल्या होत्या. या विद्यार्थिनींनी पुण्यधाम आश्रम येथील वृद्धाश्रमाच्या भोवतालचा परिसरही स्वच्छ केला. यावेळी पुण्यधाम आश्रमच्या संस्थापिका प. पू. माताजी उपस्थित होत्या.
“मुलींचे हे कार्य खूपच सुंदर आहे, त्या देशाचं भवितव्य घडवतील” अशा शब्दात माताजींनी विद्यार्थीनींचं आणि आयोजकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वच्छता अभियानानंतर विद्यार्थीनींनी कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला भेट देऊन त्याठिकाणचा आनंद लुटला.
स्वच्छता अभियानाचे आणि पुणे दर्शन सहलीचे नियोजन व व्यवस्थापन नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी केले. त्यासाठी पांडुरंग जगताप, शंकर साळुंखे, प्रियांका बनसोडे, संगीता देशमुख यांनी विशेष योगदान दिले. या स्वच्छता अभियानाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.