अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी जामीन अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) उत्तर मागितले होते. तोपर्यंत जॅकलिनचा नियमित जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित होता. त्यानंतर जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाच्या विनंतीवरून कोर्टाने जॅकलिन फर्नांडिसला 50 हजार रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाने समन्स बजावले होते. त्यानंतर आज पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला. जॅकलिन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी आहे. सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचाही आरोप जॅकलिन फर्नांडिसवर आहे.
ईडीने नुकतेच या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला आरोपी म्हणत दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात जॅकलिन आणि अभिनेत्री नोरा फतेही या दोघांनीही साक्षीदार म्हणून जबाब नोंदवला होता. यापूर्वी तपास यंत्रणेने जॅकलीनची 7.2 कोटी रुपयांची मुदत ठेवीची रक्कम जप्त केली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईडीने या प्रकरणी पहिले आरोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्या न्यायालयात दाखल केले होते. नंतर फेब्रुवारीमध्ये, ईडीने सुकेश चंद्रशेखर यांची कथित सहकारी पिंकी इराणी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. पिंकीने जॅकलिनची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिल्याचे सांगितले जात आहे. आरोपपत्रानुसार, पिंकी जॅकलिनसाठी महागड्या भेटवस्तू निवडत असे आणि सुकेश चंद्रशेखर त्यांना पैसे देत असे.