मुंबई | सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यापुढे अमिताभ यांना एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी अमिताभ यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे मंगळवारी मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. याशिवाय बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्या यामुळे मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. अमिताभ हे चित्रपट विश्वातले मोठे सेलिब्रेटी आहे. त्यांची लोकप्रियता जगभर आहे. याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.
कुणाला एक्स दर्जाची सुरक्षा द्यायची याचा निर्णय इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडून घेतला जातो. त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार, संबंधित व्यक्तींबाबत अहवाल सादर केला जातो. त्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे हा मुद्दा देखील यावेळी विचारात घेतला जातो.