मुंबई | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी म्हणजेच गुरुवारीपासूनच त्यांच्या निधनाचे पोस्टर, फोटो व्हायरल केले जात होते. त्यावरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला. ”ज्या कुणी श्रद्धांजली वाहिली, घाणेरड्या शब्दांत ज्यांनी हे मांडलं त्या सगळ्यांचा जीव आज शांत झाला असेल”, असे पोंक्षे म्हणाले.
विक्रम गोखले यांची प्रकृती जेव्हा खालावली होती. नेमकं त्याचवेळी त्यांच्या निधनाचे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. त्यांचे निधन झाले नसल्याचे एकप्रकारे स्पष्टीकरणच त्यांच्या कुटुंबियांना द्यावे लागले होते. त्यामुळे मोठी चर्चा सुरु होती. यावर शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ”विक्रम गोखले आमच्या अनेक पिढ्यांचे गुरू आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही अभिनय शिकलो, अनेक कलावंत तयार झाले. गेले चार दिवस त्यांच्या निधनाच्या बातमीचा सोशल मीडियावर सर्वांनी खेळखंडोबा केला होता. धड बातमी नसताना सगळेजण श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. ज्या कुणी श्रद्धांजली वाहिली, घाणेरड्या शब्दांत ज्यांनी हे मांडलं त्या सगळ्यांचा जीव आज शांत झाला असेल.’
दरम्यान, शरद पोंक्षे हे त्यांच्या परखड मतामुळे नेहमी चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत धारेवर धरले होते. त्यांनी तसा व्हिडिओही जारी केला होता. त्यानंतर आता त्यांनी गोखले यांच्या निधनापूर्वी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर टीका केली आहे.