‘दंगल’ चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी मुलगी सुहानी भटनागर हिचे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘दंगल’ सिनेमात आमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिकेत सुहानी दिसली होती. दंगल सिनेमानंतर सुहानी सिनेसृष्टीपासून लांब होती आणि ती सोशल मीडियावरही जास्त सक्रिय नव्हती. त्यामुळं आता तिच्या निधनाच्या बातमीमुळं संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
सुहानी भटनागरच्या संपूर्ण शरीरात फ्लूइड साठले होते, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला, तिच्या शरीरात हळूहळू द्रव जमा होऊ लागले. यासंबंधित तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.
कोण आहे सुहानी भटनागर?
सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. ती आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’ (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही काम केले आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर सुहानीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, मात्र तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.