मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये आयपीएलचा क्वालिफायर 1 हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर क्वालिफायर 1 हा सामना खेळवण्यात आला. कोलकात्यानं या सामन्यात विजय मिळवल्यानंतर संघमालक आणि बॉलिवूडचा किंग म्हणून प्रसिद्ध असणारा शाहरूख खान चाहत्यांसाठी ग्राऊंडवर उतरला. आणि त्याने ग्राऊंडवर सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले. मात्र, हे सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाहरूख खानची तब्येत बिघडल्याची आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं असल्याची बातमी समोर आली आहे.
अहमदाबादमध्येही उन्हाळ्याचा कडाका जाणवत असून तिथे 40 अंश सेल्सियस एवढे तापमाने आहे. शाहरुखला बुधवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या, शाहरुखला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून शाहरुखची प्रकृती उत्तम आहे. केवळ, उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने शाहरुखला रुग्णालयात भरती करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली. त्यांनी हैदराबादचा अख्खा डाव 159 धावांत गुंडाळला. त्यामुळं कोलकात्यासमोर विजयासाठी केवळ 160 धावांचं आव्हान होतं. कोलकात्यानं तब्बल 38 चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं. वेंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकं कोलकात्याच्या विजयात निर्णायक ठरली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी, मिचेल स्टार्कनं तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन विकेट्स काढून हैदराबादचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. मंगळवारी रात्री कोलकात्याची खेळाडूंनी पार्टी केली. डिस्कोमध्ये खेळाडूंनी जोरदार डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.