- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशनतर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त ‘धडकन’ प्रकल्प
पुणे | जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या ‘धडकन’ प्रकल्पाचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांतर्गत रोटरीच्या मदतीने २ ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग तज्ज्ञांची टीम सीपीआर जागरुकता व प्रशिक्षण देणार आहे. शहरातील विविध भागातील सोसायट्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘धडकन’ प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते लॉ कॉलेज रोडवरील नॅशनल फिल्म अर्काईव्ह येथे झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ अनिल परमार, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ जगदीश हिरेमठ, डॉ. किंजल गोयल, डॉ. सुनील साठे, पल्लवी साबळे, हेमंत शिरगुप्पी, डॉ जिग्नेश पंड्या, नरेंद्र गांधी, पद्मजा जोशी, केतन शाह, महेंद्र चित्ते, मनिषा सुर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
धडकन प्रकल्पाविषयी आणि याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सीपीआर प्रशिक्षणासंबंधी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांनी माहिती दिली. केतन शाह यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे आत्तापर्यंतचे कार्य स्लाईड शोच्या माध्यमातून सांगितले.
यावेळी डॉ. जगदिश हिरेमठ यांनी रक्तदाब मोजण्याची पद्धत सांगितली. त्याचप्रमाणे बंद पडलेलं हृदय तत्काळ सुरु करण्याची शक्ती सीपीआर मध्ये आहे असे सांगून सीपीआर नेमकं कसं करतात त्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. तसेच सीपीआर कसा करावा या संदर्भात लघुपट दाखवण्यात आला.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सीपीआर संदर्भात कुठलीही मदत करण्याचे आश्वासन दिले. तर, अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी हृदय विकाराच्या प्रथमोपचारासाठी लागणारे AED मशीन जास्तीत जास्त पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश गांधी यांनी केले.