- एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन
पुणे | “अन्न, वस्त्र, निवारा आणि कनेक्टिव्हीटी या आजच्या काळातील मूलभूत गरजा आहेत. डिजिटल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. याच गोष्टीचा लाभ घेण्यासाठी माध्यमे, राजकारण आणि उद्योग यांचे विलीनीकरण होताना दिसतेय. माध्यमांचा उपयोग करून आपले स्थान मजबूत करण्यावर राजकारण्यांकडून भर दिला जात आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या वतीने आर. के. लक्ष्मण म्युझियम, मुंबई प्रेस क्लब, द फॉरेन करस्पॉंडंट क्लब आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने विश्वराज बाग, लोणी काळभोर येथील विश्वशांती सभागृहात (घुमट) आयोजित तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या (एएनआय) संपादिका स्मिता प्रकाश, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक राशीद किडवई, आर. के. लक्ष्मण म्युझियमच्या संचालिका उषा लक्ष्मण, एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे संचालक धीरज सिंह, दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, विद्यार्थी प्रतिनिधी इर्तिका एजाज, तेजस कोल्हटकर आदी उपस्थित होते.
एनडी टीव्हीचे वरिष्ठ संपादक सुशीलकुमार महापात्रा (ब्रॉडकास्ट), मुक्त पत्रकार रवलीन कौर (प्रिंट) व मुक्त पत्रकार नीतू सिंग (डिजिटल) यांना पहिला ‘जर्नालिझम फॉर पीस’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
जवाहर सरकार म्हणाले, “कोविड काळात ओटीटी, मोबाईल जर्नालिझमने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, वाहिन्या यांसह सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या नवमाध्यमांचा प्रभाव मोठा आहे. निर्भया प्रकरण, अण्णा हजारे यांचे आंदोलन, नरेंद्र मोदी यांचे लॉन्चिंग यामध्ये या नवमाध्यमांचा फार प्रभावी उपयोग केला गेला. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप द्वारे परिवर्तनाच्या मोहीमा राबवल्या गेल्या. आज ही माध्यमे आपल्या प्रत्येकाच्या हाती आल्याने प्रत्येकाला आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे.”
स्मिता प्रकाश म्हणाल्या, “माध्यमांचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने सामान्य नागरिकही आवाज उठवू शकतो. सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाच्या हाती नवी माध्यमे आल्याने स्वतःकडे लक्ष खेचून घेण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातून गोंधळाचे वातावरण, चीड आणि नकारात्मता तयार होत आहे. मात्र, अशा गोंधळ घालणाऱ्यांपासून आपण सावध राहत नैतिकता आणि तत्वनिष्ठता जपायला हवी. भारतातील माध्यम उद्योग व्यापक आहे. येथे २३ पेक्षा अधिक भाषेत वृत्तपत्रे निघतात. ९०० पेक्षा अधिक सॅटेलाईट चॅनेल्स असून, हजारो डिजिटल चॅनेल्स व पोर्टल्स यामुळे वेगवेगळ्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.”
रशीद किडवई म्हणाले, “कालानुरूप माध्यमे बदलली, तशी आव्हानेही बदलली. या आव्हानांना समजून घेत समाजहिताची पत्रकारिता करण्यावर आपण भर द्यावा. सदोष निवडणूक प्रक्रियेमुळे माध्यमांचा गैरवापर, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. पत्रकारांना थेट महत्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचता येते, या भावनेतून अनेक राजकारणी, उद्योजक माध्यमे हाताशी धरतात किंवा माध्यम संस्था सुरु करतात. गेल्या काही काळात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेक माध्यमे उदयास येत आहेत.”
उषा लक्ष्मण म्हणाल्या, “आपल्या कुंचल्यातून जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधानांच्या कालखंडावर आर. के. लक्ष्मण यांनी भाष्य केले. ‘कॉमन मॅन’ला वेगळी ओळख दिली. चांगल्या-वाईट गोष्टीवर व्यंग्यचित्रांतून आवाज उठवत सामान्य माणसांचे प्रश्न त्यांनी मांडले. सर्वच राजकारण्यांनी त्यांच्या या अभिव्यक्तीचा आदर केला. आपल्या हाती असलेल्या माध्यमांचा उपयोग विधायकपणे करून सामान्य माणसाला न्याय देण्याची आपली भूमिका असायला हवी.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर समाजप्रबोधन, परिवर्तनाचे दायित्व आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे. सोशल मीडियाच्या प्रभावी काळात संवादाभिमुख व शांततापूर्ण वातावरणात समाजाहिताची पत्रकारिता होणे गरजेचे आहे. जातीयवाद, धर्मिकता, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला आळा घालून विकासाच्या मुद्यांवर बोलणारी पत्रकारिता ही आजची गरज आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी उपस्थितांना ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले. सुशीलकुमार महापात्रा, नीतू सिंग, रवलीन कौर यांनी सत्काराला उत्तर दिले. स्वप्नील बापट, मुकेश शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रवीकुमार चिटणीस यांनी ‘एमआयटी’ मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. धीरज सिंग यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुरुप्रसाद राव यांनी आभार मानले.