नवी दिल्ली | मोबाईल फोन वापरताना कुठंही गेलं तरी चार्जर सोबत घेऊन जाणे गरजेचे बनले आहे. पण आता आपली ही अडचण दूर होणार आहे. कारण भारत सरकारकडून सर्वच मोबाईल्ससाठी एकच चार्जर आणण्याचा विचार केला जात आहे. याचा फायदा कोट्यवधी मोबाईल युजर्सना होणार आहे.
अनेकदा मोबाईल बदलला की चार्जर बदलावे लागते. सध्या सी-टाईप, मायक्रो बी कनेक्टर, लायटनिंग कनेक्टर असे चार्जरचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे मोबाईल युजर्सला त्यांच्या मोबाईलनुसार चार्जर बाळगावा लागत आहे. पण आता असे करावे लागणार नाही. कारण, भारतात सर्वच गॅझेटसाठी आता एकच चार्जर वापरण्यास कंपन्यांकडून सहमती मिळाली आहे. मोबाईल कंपन्यांसह या क्षेत्रातील इतरही कंपन्यानी या संकल्पनेसाठी तयारी दर्शवली आहे. ग्राहक मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यतेखाली टास्क फोर्सची एक बैठक झाली. त्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, आता एकच चार्जर अंतिम करण्यासाठी एक-एक टीम बनविण्यात आली आहे. मात्र, अद्यापही सी टाईपचा किंवा इतर कुठल्याही चार्जरसाठी अंतिम निर्णय झाला नाही. बैठकीनंतर सर्वच प्रतिनिधींनी एक कॉमन चार्जिंग पोर्ट जारी करण्याबाबतच्या चर्चेवर सहमती दर्शवली.