बारामती | चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 2024 ला पवारांचं विसर्जन करायचं आहे असेही ते बोलले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘गणपतीची स्थापना होऊन सातवा दिवस आहे. आज आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत. गणपती पुढच्या वर्षी परत येत असतो. 2024 पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याची सुरुवात करायला बारामतीत आले आहेत.’
‘भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेनं कौल दिला होता. पण एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. एखाद्याचं हिसकावून घ्यायचं, यात बारामतीकरांना फार आनंद असतो. इथल्या लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्यात विश्वासघातानं सरकार आलं. त्यानंतर पहिल्या अधिवेशनात सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या धावपळ करत होत्या. जनतेनं सरकार निवडून दिल्यासारखं स्वागत करत होत्या’, अशी टीका पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
‘लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. निर्मला सीतारामन यांच्यावर बारामतीची जबाबदारी दिली. निर्मला सीतारामन या बिनटाक्यांचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या, तर ऑपरेशन कसं झालं हे पवारांनाही कळणार नाही’, असं म्हणत पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.