पुणे | आपल्या आराध्य दैवताला म्हणजेच गणपती बाप्पाला उद्या (दि 9) थाटात निरोप दिला जाणार आहे. यासाठी पुण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. 2 वर्षांनंतर राज्यभरात उद्या अनंतचतुर्दशी साजरी होत असून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे शहर देखील सज्ज झाले आहे. शहरातील महापालिका, पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मिरवणुक सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 8000 पोलीस कर्मचारी, 1200 CCT, SRPF आणि होमगार्डच्या अतिरिक्त कंपन्यांसह स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.
यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते होणार असून, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास विक्रम कुमार पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. शहरातील सगळ्या घाटांवर सुरक्षेसाठी लाईफ गार्ड उपस्थितीत असणार असून, कोरोना काळात घरगुती गणपती विसर्जनासाठी शहरात वापरले गेलेले फिरते हौद यावर्षी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिरती शौचालयांची उभारणीदेखील करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी (दि. 9) गणेश विसर्जन होणारी मंडळे, घरगुती गणपतींच्या संख्येत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या 2 हजार 969 तर, घरगुती गणपती 2 लाख 22 हजार 977 इतके आहेत. आत्तापर्यंत 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन झालेली सार्वजनिक मंडळे – 333 असून, 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत विसर्जन झालेले घरगुती गणपतींची संख्या दोन लाख 4 हजार 653 इतकी आहे.
मुख्य मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. अतिरीक्त पोलिस आयुक्त – 4 पोलिस उपायुक्त – 10 सहाय्यक पोलिस आयुक्त 21 वरिष्ठ पोलिस निरीक्षक – 55 पोलिस उपनिरिक्षक/सहाय्यक पोलिस निरीक्षक – 379 पोलिस कर्मचारी – 4 हजार 579 बंदोबस्तासाठी बाहेरुन बोलाविण्यात आलेले अधिकारी कर्मचारी सहाय्यक पोलिस आयुक्त – 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षक 10 सहाय्यक पोलिस – निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक – 50 पोलिस कर्मचारी – 250 एसआरपीएफ कंपन्या – 02 गृहरक्षक दल 259 उपस्थित असणार आहे.
बंदोबस्तासाठी अधिकची काळजी म्हणून विसर्जन मिरवणुकीचे पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी वृद्ध, महिला, बालकांवर पोलिसांचे विशेष लक्ष असेल तसेच चोरी, छेडछाड टाळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रीय करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर नागरिकांसाठी मदत केंद्र उभारली गेली आहेत.