पुणे | कोरोनामुळे गेली 2 वर्षे सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंधमुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. दरवर्षी पुण्यात मानाचे पाचही गणपतींचे विसर्जन हे आठ वाजेच्या आत होत असतात. यंदा मात्र दोन वर्षांच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला. तब्बल 10 तास मानाच्या गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक चालली. त्यानंतर देखील काही मंडळे हे लक्ष्मी रस्त्यावर आणि कुमठेकर रस्त्यावर थांबली होती. यामुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. गणेश मंडळांचे डीजे स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बंद केले. यावेळी गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण होते. यावेळी आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा संताप झाल्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलका टॉकीज चौक येथे गणपती विसर्जन मिरवणुकीचे रथ पुढे जात नसल्याने थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ॲक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळाले. आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून मिरवणुकीतील गोंधळ कमी करण्यासाठी थेट मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचन दिल्या.
भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ मित्र मंडळ हे शुक्रवारी रात्री कुमठेकर रोड वर थांबले होते. वारंवार अनेक मंडळाने पोलिसांना आणि महापालिका प्रशासनाला सांगून सुद्धा मंडळ आपली मिरवणूक पुढे घ्यायला तयार नव्हते. नवनाथ मित्र मंडळ रस्त्यावर थांबल्याने बाकीच्या मिरवणुका खोळंबल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन दीपक पोटे यांच्या मंडळाला पुढे जाण्याच्या सूचना दिल्या.
पुण्यातल्या मानाचे गणपतीचे मिरवणुकीला नेहेमी पेक्षा यावर्षी अधिक वेळ लागला. करोना निर्बंध मुक्त होत असताना जोशात आणि जल्लोषात गणेश विसर्जन साजरी होत आहे. या वर्षी ढोल ताशा पथकांची संख्या नेमहेमी पेक्षा अधिक असल्याने मानाच्या पाचही गणपती विसर्जनाला वेळ लागळा, असे पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. दरवर्षी रात्री 12 वाजेनंतर निघणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक यंदा पहाटे 6 वाजाल्याच्या सुमारास निघाली. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्रश्न विचारण्यात आला. एकूणच विसर्जन मिरवणुकीला उशीर झाला, अशी माहिती त्यांनी दिली.