रत्नागिरी | जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन वातावरण तापलं आहे. रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. तसंच, गणेशोत्सवात प्रकल्पाविरोधात बॅनरबाजी करुन लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र आता हा वाद थेट राजकीय नेत्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना रिफायनरी विरोधात असणाऱ्या आंदोलकांनी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापूर दौऱ्याच्या वेळी ही घटना घडली आहे. रिफायनरी विरोधक जोशी नामक नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जोशी नामक नेत्याचा व्हिडओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आमदार सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.
दरम्यान, नाणारनंतर आता रत्नागिरीतील बारसू-सोलगाव रिफायनरीवरून स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारसु-सोलगाव रिफायनरीसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका तीव्र केली असून, ही रिफायनरी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा रिफायनरीविरोधकांचा आरोप आहे.