पुणे | कर्ज प्रकरणात जामीनदाराला सातत्याने नोटीस बजावून त्याच्याकडून पैसे उकळून त्रास देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन पोलिसांसह तिघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यवान ज्ञानदेव निकम, हवालदार सचिन रामचंद्र बरकडे आणि किरण भातलवांडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजेंद्र उर्फ राजू राऊत असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत राऊत यांच्या 23 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणीचे वडील राजेंद्र राऊत आणि आरोपी किरण हे मित्र आहेत. आरोपी किरण यांनी चारचाकी गाडीसाठी कर्ज घेऊन त्या प्रकरणात राऊत यांना जामीनदार केले होते. मात्र, किरण यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जामीनदार राऊत यांना नोटीस बजावली. ही नोटीस घेऊन समर्थ पोलीस ठाण्यातील निकम आणि बरकडे सतत राऊत यांच्याकडे जात होते.
अटक होऊ नये म्हणून राऊत यांनी दोघा पोलिसांना वेळोवेळी 7 ते 8 हजार रुपये दिले. यानंतरही पोलीस कर्मचारी त्यांच्याकडे जात होते. त्यामुळे राऊत यांनी त्यांचा मित्र किरणला हप्ते भरण्यास सांगितले. परंतु हप्ते न भरता किरण याने राजेंद्र राऊत यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी पहाटे नाना पेठेतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, राजेंद्र राऊत यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.