मुदतीआधीच वेबसाईट व फोन नॉटरीचेबल का? नागरिकांमधून संतप्त सवाल
पुणे : महिला आणि बालकल्याण विकास विभागातर्फे बंपर नोकर भरती जाहीर करण्यात आली होती. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळवण्यासाठी व संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमांतून या नोकर भरतीची जोरदार जहिरातबाजी देखील करण्यात आली होती. उद्या (19 ऑगस्ट) अर्ज भरण्याची अंतिम मुदत असताना प्रत्यक्षात मात्र या महिला आणि बालकल्याण विकास मंडळाच्या वेबसाईटवर अर्ज भरता येत नाही. या नोकर भरतीत काळंबेरं आढळून येत आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे हनुमंत चाटे यांनी फॉर द पीपल न्यूज शी बोलताना केले आहेत.
महिला आणि बालकल्याण विकास मंडळात एकूण 195 जागा निघाल्या होत्या. या भरतीची प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2022 रात्री 12 पर्यंत आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची असून त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र संकेतस्थळावर लॉग इन केले असता अर्जदारांना अनेक तांत्रिक त्रुटींचा सामना करावा लागतोय. अर्जदारांना अर्ज करत असताना पुढील प्रक्रियेसाठी अडचणी येत असून त्यात कोटा ( राखीव ) पद्धत दर्शवली जात आहे . तसेच अधिकच्या माहितीसाठी देण्यात आलेला दूरध्वनी क्रमांक अवैध येत आहे.
या भरती अंतर्गत सर्व जिल्हे मिळून 158 पदे तसेच बाल न्याय मंडळासाठी 18, बाल कल्याण समितीमध्ये 19 तसेच डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून एकूण 195 रिक्त जागा आहेत. त्यांची गुणवत्ता यादी द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात येणार आहे. सदर पदे संपूर्णतः कंत्राटी तत्वावर उपलब्ध आहेत.
या पदांच्या भरतीसाठी कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन किंवा पोस्टाने अर्ज स्वीकारले जाणार नसून ते ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार अशी महिला आणि बालकल्याण विकास मंडळाची अट आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने इच्छुक वर्गामध्ये सभ्रम निर्माण झाला असून ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत, असेही हनुमंत चाटे यांनी फॉर द पीपल न्यूज शी बोलताना सांगितले.