औरंगाबाद | औरंगाबाद खंडपीठाने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दणका दिला आहे. राज्य महसूल मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या एका आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाजार समितीच्या एका जागेचं प्रकरण न्यायप्रविष्ट झालं होतं, त्यानंतर न्यायालयाने व्यवहाराला मान्यता दिली असताना देखील तत्कालीन महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. तर याचवेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात संबंधित लोकं न्यायालयात गेले असता न्यायालयाने अब्दुल सत्तारांच्या आदेशाला स्थगिती देत भूखंडावरील स्थगिती उठवली आहे.
यावरून देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना काय सुनावले?
शिंदे-फडणवीस सरकारची सोमवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली यामध्ये सरकारनं अनेक निर्णय घेतले. यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना सुनावल्याची चर्चा आहे. लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारचे काही निर्णय परस्पर जाहीर केल्यामुळं फडणवीस सत्तारांवर चांगलेच संतापले होते. तसंच यापुढे परस्पर निर्णय जाहीर करु नका असे आदेशही फडणवीसांनी सत्तार आणि इतर मंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या सर्व नाट्यानंतर मंत्र्याना समज दिली आहे.