नांदेड | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण करण्यात आली होती. जत तालुक्यातल्या लवंगा युपीच्या चौघा साधूंना बेदम मारहाण झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यात मुलं चोरणाऱ्या टोळींच्या अफवांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
सोशल मीडियावरील अफवांमुळे काही जणांना मारहाण ही झाली आहे. “मारुती सुझुकी गाडीमध्ये नांदेड शहरातील 5 मुले पळवून नेली, आताच पोलीस स्टेशन ने कळवले. अशा अफवा सध्या नांदेडमध्ये अनेकांच्या व्हॉट्सॲपवर येत आहेत. या अफवा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे नागरिकांनी काही जणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 2 युवकांना चोर समजून रस्त्यावर काहीजण मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर एका मनोरुग्णास चोर समजून मारहाण झाली आहे. या ठिकाणी पोलीस वेळीच पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अफवांमुळे ग्रामीण भागातही दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक गावखेड्यात ग्रामस्थ रात्र जागून पहारा देत आहेत.
सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू आहे. जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कर्नाटक मधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना लवंगा या ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. मात्र साधूंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन उमदी पोलीस ठाण्यामध्ये साधूंच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केले आहे.