- हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांची प्रमुख उपस्थिती
पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर जगदीश्वर मंदिराशेजारी धनगर पाडयावर राहणा-या व गडावर ताक विकणा-या कमल शिंदे या मुलीला शिक्षणासाठी पुणेकरांतर्फे १ लाख रुपयांची आर्थिक शैक्षणिक मदत देण्यात आली. शिक्षणाच्या माहेरघरापासून काही मैलांवर असलेल्या रायगडाच्या परिसरात ही मुलगी व तिचे कुटुंब रहात असून तिला शिक्षणाची खूप आवड आहे, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे तिला शिक्षणाकरिता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण घेऊन पुण्यात आलेल्या करण तावरे व रोहन काळे यांनी पुढाकार घेत ही आर्थिक मदत दिली आहे.
गंज पेठेतील महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाडयाच्या प्रांगणात ही मदत देण्यात आली. यावेळी हवेलीच्या पहिल्या महिला तहसीलदार तृप्ती कोलते, करण तावरे, रोहन काळे, विराज तावरे, रायगडजवळील ग्रामस्थ मनोहर औकिरकर, संदीप ढवळे,संतोष शिंदे, रमेश औकिरकर आदी उपस्थित होते. एक लाख रुपयांचा धनादेश कमल शिंदे हिला सुपूर्द करण्यात आला.
तृप्ती कोलते म्हणाल्या, महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना आजच्या स्त्रियांनी कितीही वंदन केले, तरी देखील त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड होणार नाही. त्यामुळे आपण ज्या मुली किंवा स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना मदत करण्यासाठी समाजामधून दातृत्व पुढे येण्याची गरज आहे. रायगडावर सेवा देणा-या कुटुंबातील मुलीला मदत देणे, हे देखील असेच दातृत्वाचे उदाहरण आहे. शिक्षणासाठी मुलींना जिथे जिथे झगडावे लागत असेल, तेथे आजच्या तरुणाईने पोहोचायला हवे.
करण तावरे म्हणाले, प्रशासकीय सेवेतील महिलांकडे बघून अनेक मुली घडतील. त्यामुळे अशा महिलांचा आदर्श आताच्या मुलींसमोर हवा. जेथे जेथे शिक्षणासाठी आर्थिक, साहित्यरुपी गरज असेल, तेथे आम्ही ती पोहोचविण्याचा नक्की प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. रोहन काळे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत अनेक मुली शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात महिलांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्याची गरज आहे. मात्र, मुलींची ही जडणघडण होत असताना शिक्षणाच्या वयात त्यांना आवश्यक ती मदत द्यायला हवी. कमल ला भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा असून तिला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.