मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे कारभार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. या टीकेला आता श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आहे. संबंधित फोटो हा मंत्रालय किंवा वर्षा बंगल्यावरील नाही, तर आमच्या घरातील आहे. ती माझी खुर्ची आहे, मात्र माझ्या मागे ठेवलेल्या बोर्डविषयी मला कल्पना नव्हती, असा दावा श्रीकांत शिंदेंनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्विट करत ते ‘सुपर सीएम’ झाल्याचे आरोप केले होते.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत, ते 18-20 तास काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही कारभार सांभाळायची गरज नाही. जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यात घरचं ऑफिस आहे. ठाण्याच्या लुईसवाडीतील खासगी निवासस्थानातील हे कार्यालय आहे. मंत्रालय किंवा वर्षा या शासकीय निवासस्थान नाही, असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलं. आम्ही दोघंही इथल्या ऑफिसचा वापर करतो. साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच वर्षानुवर्ष इथे हजारो जण येतात, त्यांच्या समस्या मांडतात.
मी वर्षा किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो नाही. माझ्या मागे दिसणारा बोर्ड टेम्पररी होता, तो एका जागेवरुन दुसरीकडे नेता येतो. एकनाथ शिंदे साहेबांची व्हीसी असल्यामुळे त्याचं नियोजन करण्यात आलं होतं. फोटोत चुकीचा अँगल घेऊन कुणाला तरी मुद्दाम खोडसाळपणा करायचा होता आणि हा मुद्दा गाजवायचा होता, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.