पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीरांनी आपल्या जीवनामध्ये खूप खडतर व कठीण प्रसंगांना तोंड देऊन ज्ञानदानाची गंगा घरोघरी पोहोचवली. अस्पृश्य, गोरगरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे व समाज घडला पाहिजे हे कर्मवीर भाऊरावांचे विचार होते, असे पर्यावरण मित्र पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लेखक काशिनाथ सोलनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सोलनकर यांनी यावेळी आपल्या वक्तृत्व शैलीने मुलांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानात त्यांनी कर्मवीरांचे विचार आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला. कर्मवीरांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य संकटांना तोंड दिले, ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांनी कधीच आपल्या घराचा किंवा संसाराचा विचार केला नाही. या गोष्टी त्यांनी लक्ष्मीबाई यांच्या मंगळसूत्राची गोष्ट सांगून मुलांना पटवून दिल्या.
यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार नितीन चितळकर, दादासाहेब शेंडगे, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी तन्मय कांबळे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथ अवचर व रेश्मा मांढरे यांनी केले. दिनेश आत्राम, विकास तिरखुंडे, प्रियांका अगरवाल, सविता दहिफळे, शैलेश घोंगडे यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार साधना शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन पांडुरंग जगताप यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.