मुंबई | पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली असून केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला आहे. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच पुढे सुद्धा अशी कीड जेव्हा-जेव्हा तयार होईल तेव्हा-तेव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान तपास यंत्रणांच्या शिफारसीनंतर पीएफआयवर गृहमंत्रालयाने संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते.
राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे की, “PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा तेव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन.”
22 सप्टेंबर रोजी एनआयए तसंच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित 106 लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास 247 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता या तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे केलेल्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घातली आहे.