नवी दिल्ली | केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील. पहिले सीडीएस बीपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं. अनिल चौहान यांनी सुमारे 40 वर्षांच्या त्यांच्या लष्करी कारकिर्दीत अनेक कमांड, स्टाफ आणि इंस्ट्रूमेंटल पदांवर काम केलं होतं. जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतात बंडविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा त्यांना अनुभव आहे.
अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला होता. 1981 मध्ये त्यांनी 11 व्या गोरखा रायफल्समधून भारतीय सैन्यात काम करण्यास सुरुवात केली होती. पुण्यातील राष्ट्रीय संक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीचे देखील ते माजी विद्यार्थी आहेत.
अनिल चौहान यांनी मेजर जनरल म्हणून काम करताना आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या बारामुला सेक्टरमधील नॉदर्न कमांडमध्ये काम केलं. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांच्यावर इशान्य भारतातील लष्करी जबाबदारी होती. सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी जनरल ऑफिसर कमाडिंग इन चीफ ऑफ इस्टर्न कमांड या पदावर काम केलं. मे 2021 मध्ये भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले होते.
अनिल चौहान यांनी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सची जबाबदारी देखील सांभाळली होती. चौहान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अंगोला मोहिमेत सहभाग घेतला होता. भारतीय सैन्यदलातून निवृ्त्त झाल्यानंतर देखील त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये योगदान दिलं होतं.