पुणे | माँ आशापुरा माता मंदिर नवरात्र उत्सवामध्ये बुधवारी सायंकाळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते देवीची पत्नी प्रसिद्ध शेफ व ब्लॉगर जुगनु गुप्ता यांच्यासोबत आरती झाली. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात केलेली सजावट, आरती, विविध यज्ञ व विधी यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर माँ आशापुरा माता मंदिरात दर्शनासाठी येत असून त्यांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात येते. समाजातील दुर्लक्षित घटकांनाही आरतीसाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येत असून त्यांच्या हस्ते आशापुरा मातेची आरती करण्यात येत असल्याचे माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवात आशापुरा माता मंदिरात दररोज अभिषेक, नवचंडी महायज्ञ, श्रीसुक्त पाठ, भजन, माता की चौकी हे विधी व कार्यक्रम सुरु आहेत. दररोज दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भक्त येत असून दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था, त्यांची सुरक्षा, वाहतूक व पार्किंग, प्रसाद, अभिषेक व महायज्ञ यासाठीचे सर्व नियोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्रनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
“नवरात्र उत्सवात सकाळी ७ ते ११ दरम्यान अभिषेक, दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत नवचंडी महायज्ञ आणि शनिवार (१ ऑक्टोबर) आणि सोमवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३० वाजता देवीचा भजन-संगीत व माता की चौकी हा गीत-संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तर, दरवर्षीप्रमाणे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. तसेच, मंगळवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३० वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. माँ आशापुरा माता मंदिरात (गंगाधाम चौक, पुणे ) होणाऱ्या नवरात्र महोत्सवासंदर्भात अधिक माहितीसाठी आणि अभिषेक व नवचंडी यज्ञ च्या बुकिंगसाठी 9372727907 / 9067534088 किंवा www.ashapuramatamandir.com यावर संपर्क साधावा. –-विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)