लोन अॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पुणे पोलिसांनी देशभराताला सगळ्यात मोठा लोन ॲप घोटाळा उघड केला आहे. बंगळूरु, महाराष्ट्रासह देशभरातून 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो खाती गोठवण्यात आली असून तब्बल एक कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यात आहे.
झटपट कर्ज मिळवण्यासाठी काही अॅप आले आहेत. यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही खूप वाढले आहेत. भारतात अवैध कर्ज देणाऱ्या अॅपचा सुळसुळाट झाला आहे. ग्राहकांना लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे. सर्वसामान्यांच्या पैशांवर ॲानलाईन खंडणीचा दरोडा कसा टाकला जातो हे आपण जाणून घेऊया.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे तब्बल एक लाख लोकांचा डेटा तयार होता. म्हणजेच तब्बल एक लाख लोकांना फसवण्याची तयारी 16 ॲपच्या माध्यमातून या ॲानलाईन दरोडेखोरांनी केली होता. तुमचा डेटा, फोटो घेऊन ते मॅार्फ करून तुमच्या कॅानटॅक्ट लिस्ट मधील लोकांना पाठवले जातात. त्याबदल्यात पैसे मागणाऱ्या या दरोडेखोरांच्या मागे अगदी परदेशातल्या सिंडीकेट काम करत असल्याच पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
दरोडेखोरांनी फोन करण्यासाठी लाखो सिमकार्ड वापरले आहेत. ज्या खात्यांवर पैसे घेण्यात आलेत हे सर्वजण कमी शिकलेले किंवा मजूर यांची आधारकार्ड बनवून त्यांवर तयार केलेली खाती ही फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी वापरण्यात आली आहेत. पुणे सायबर पोलिसांनी कोट्यावधी रूपयांसह अशी हजारो खाती गोठवली आहेत.
ॲानलाईन फसवणुकीचा आतापर्यंतचा सर्वात भयानक प्रकार आहे. यामध्ये आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक शोषण देखील या प्रकारात होत आहे. ज्यामुळे अगदी आत्महत्या ते खून होण्यापर्यंत हे प्रकरण पुढे गेले आहे. त्यामुळे तात्काळ मोबाईलवर कर्ज देतो असं कुणी सांगितलं मेसेज केला तर त्यावर क्लिक करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.