कोल्हापूर | शहरामध्ये आज दुपारी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जाता जाता परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पंचमी दिवशी भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सोयाबिन आणि भात मळणीला ऐन दसऱ्यामध्येच वेग आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची धावपळ उडाली.
कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल मार्गावर जोरदार वार्याने अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. शिवाजी विद्यापीठ परिसरातही झाडे वाऱ्याने मोडली गेली. शहरातील शाहू मिल चौकातही झाड कोसळल्याची घटना घडली.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडेत झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली. या महाकाय झाड कोसळल्याने कोणतीही सुदैवाने जिवितहानी झाली नाही. हे वडाचे सव्वाशे वर्षांचे असल्याचे बोलले जाते. दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून साबळेवाडी-खुपिरे-दोनवडे-वाकरे मार्गे वाहतूक सुरु आहे.