- माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टतर्फे समारंभाचे आयोजन
पुणे | माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्वी नवदुर्गा सन्मान पुरस्काराची घोषणा झाली असून येत्या रविवारी (२ ऑक्टोबर) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, प्रसिद्ध शेफ व ब्लॉगर जुगनु गुप्ता आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात रविवारी सायंकाळी ७ वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. दरवर्षी होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समाजातील यशस्वी व कर्तृत्वान महिलांचा यशस्वी नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
यावर्षी दिल्या जाणारा हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील अंजली तापडिया, मनोरंजन क्षेत्रातील चाहत दलाल, क्रीडा क्षेत्रातील देशना नहार, लाईफटाईम अचिव्हमेंट अर्थात जीवनगौरव पुरस्कार मेधा सामंत, पत्रकारितेसाठी नम्रता फडणीस, समाज माध्यम क्षेत्रातील रचना रानडे, उद्योजिका संजना देसाई, फिलांथ्रोपिस्ट सविता नाईकनवरे, लायन्स क्लबच्या सीमा दाबके आणि शासकीय क्षेत्रातील विनीता साहु यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीकडून या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
“महिलांमधील कर्तृत्वाचा सन्मान हा खऱ्या अर्थाने देवी मातेचाच सन्मान आहे. नवरात्र उत्सवात देवीचा जागर होत असताना देवीच्या दारात, देवीच्या साक्षीने समाजातील कर्तृत्वान व यशस्वीपणे कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याने महिलांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होते. त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळते. चांगल्या कार्याचा यानिमित्ताने जागर होतो. म्हणूनच नवदुर्गांचा सन्मान आम्ही करतो. आपण या कर्तृत्ववान व यशस्वी महिलांच्या सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती.”
विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)